बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाल्यामुळे ती न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तिनं लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केल्याचंही पाहायला मिळत आहे. तसंच काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिला आधार दिला आहे. सोनालीचा हा आजार अचानक कसा काय उद्भवला असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असून त्यावर नुकताच डॉक्टरांनी खुलासा केला आहे.

‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनुसार’, सोनालीला हा कॅन्सर कोणत्याही संसर्गातून किंवा अन्य कारणामुळे झाला नाही. तर सोनालीने किरकोळ आजारपणाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे झाला. सोनालीचं गेल्या अनेक दिवसापासून अंग दुखत होतं. मात्र त्याकडे तिने निव्वळ दुर्लक्ष केलं. किरकोळ आजार समजून तिने डॉक्टरांकडे जाणं टाळलं. तिच्या या दुर्लक्षितपणामुळे तिच्या कॅन्सरने शेवटची स्टेज गाठली, असं सोनालीवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं.

डॉक्टर पुढे असंही म्हणाले, ‘जर सोनालीने वेळीच लक्ष दिलं असतं तर तिच्यावर ही वेळ आली नसतं. यापूर्वीच कॅन्सरच निदान झालं असतं आणि योग्य वेळी उपचार सुरु केल्यावर हा आजार आटोक्यातही आला असता. मात्र अजूनही वेळ गेली नाही, आमचे प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे सोनाली या स्टेजमधूनही सुखरूप बाहेर येईल’.

दरम्यान, सोनालीच्या कॅन्सरची माहिती मिळताच अभिनेता अक्षयकुमारने न्युयॉर्कला जाऊन सोनालीची भेट घेतली होती. तर लिसा रे, मनीषा कोइराला या अभिनेत्रींनीही ट्विटरद्वारे तिला आधार दिला होता.