नोव्हेंबर २००७ मध्ये एकीकडे रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा पहिला चित्रपट ‘सावरिया’ प्रदर्शित झाला तर दुसरीकडे ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला रणबीर आणि सोनमच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. मात्र नंतर रणबीर दीपिका पदुकोणकडे वळला. आता दहा वर्षांनंतर सोनम आणि रणबीरमधील मैत्रीचे नाते पूर्ववत झाल्यानंतर दोघांनी एकत्र चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र नुकतंच रणबीरने सोनमची तुलना कतरिना कैफशी केल्याने दोघांमध्ये आता पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय.

आपला आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करत असताना रणबीर म्हणाला की, ‘जेव्हा फॅशनचा विषय असतो तेव्हा कतरिना ही सर्वांच्या पुढे असते. कोणालाही माहित नसलेले ब्रँड्स ती शोधून काढते आणि त्याचे कपडे घालते. त्याच्या ३ महिन्यानंतर लोकांना त्या ब्रँड्सबद्दल माहिती मिळू लागते.’ कतरिना आणि सोनमच्या फॅशनमध्ये तुलना करताना तो पुढे म्हणाला की, ‘फॅशनसाठी म्हणून कदाचित कतरिनाला तेवढं मानलं जात नाही जेवढं सोनम कपूरला मानलं जातं. कतरिनामध्येही कुठेतरी एक फॅशन आयकॉन दडलाय असं मला वाटतं’

katrina-ranbir-sonam

वाचा : …हे आहेत बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्शिअल कपल्स’

रणबीरने केलेल्या या तुलनेमुळे सोनम त्याच्यावर खूप रागावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना जरी स्टायलिश असली तरी रणबीरने दोघींमध्ये तुलना करणे मूर्खपणाचे असल्याचे सोनमने म्हटले. ‘फॅशन आणि लूकच्या बाबतीत कतरिना प्रयोगशील नाही,’ असंही सोनमने पुढे म्हटलं. इतकंच नाही तर ‘जग्गा जासूस’साठी हे ‘प्रमोशनल स्टंट’ असल्याचेही तिने म्हटलंय. त्यामुळे सोनम आणि कतरिनाची तुलना करणे रणबीरला चांगलेच महागात पडले आहे असे म्हणायला हरकत नाही.