लॉकडाउनमुळे परराज्यातून आलेले मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे सरकारकडूनही त्यांच्यासाठी काही विशेष गाड्यांची सोय केली आहे. तसंच अभिनेता सोनू सूददेखील दिवस-रात्र या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सोनूने मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासोबतच अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाचीही सोय केली आहे. तसंच मदतकार्यासाठी त्याचं संपूर्ण हॉटेल्सही दिले आहेत. सोनूचं हे मदतकार्य पाहून सामान्य जनतेसोबतच कलाविश्वातील अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे शेफ विकास खन्ना याने सोनूला एक खास गिफ्ट दिलं आहे.
शेफ विकास खन्ना हे नाव साऱ्यांनाच परिचित आहे. सेलिब्रिटी शेफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासने सोनू सूदचं मदतकार्य पाहून त्याच्यासाठी एक खास डिश केली आहे. विशेष म्हणजे त्याने या डिशला जे नाव दिलं आहे, त्या नावाचा आणि सोनूचा फार जवळचा संबंध आहे. विकासने या नव्या डिशचं नाव ‘मोगा’ असं ठेवलं आहे.
‘मोगा’ हे सोनू सूदच्या गावाचं नाव असून ते पंजाबमध्ये आहे. ही नवीन डिश तयार करुन त्याविषयीची माहिती विकासने इन्स्टाग्रामवर दिली आहे.सोबतच सोनू सूदसाठी एक खास मेसेजही दिला आहे.
“प्रिय सोनू सूद. तू दररोज आम्हाला नवीन प्रेरणा देत आहेस. तुझं कौतूक करण्यासाठी मी कोणतीही नवीन रेसिपी करु शकत नाहीये. मात्र तुझ्यासाठी एक खास पदार्थ पाठवत आहे. या डिशचं नाव तुझ्या गावावरुन मोगा असं ठेवलं आहे”, असं कॅप्शन विकास खन्नाने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, विकास खन्नाची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोनूनेदेखील लगेचच त्याला रिप्लाय देत ‘धन्यवाद’ म्हटलं आहे. सध्या सोनू विविध मार्गाने गरजुंसाठी मदत करत आहे. सोनूने अंधेरी, जुहू, जोगेश्वरी आणि वांद्रे येथील जवळपास ४५ हजार जणांना जेवण पुरविल्याचं म्हटलं जात आहे.