करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली आहे. परंतु या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. त्यातच परराज्यांतून अलेल्या अनेकांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे काही जण त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यात केंद्र सरकारनेही कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. परंतु हा खर्च काहींना परवडत नसल्यामुळे ते पायी त्यांच्या गावी निघाले आहेत. यात अभिनेता सोनू सुद त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सोनूने या गरजुंसाठी बसेसची सोय केली आहे. तसंच ‘आपण घरात एसीमध्ये बसून त्यांचं दु:ख समजू शकत नाही’, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
अभिनेता सोनू सुद गेल्या कित्येक दिवसांपासून विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. अनेकांना जेवण पुरविण्यासोबतच त्याने आता गावी पायी चालत जाणाऱ्यांसाठी बसची सोय केली आहे. सोनूने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून रितसर परवानगी घेऊन मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे खुद्द सोनू प्रत्येक मजुराला निरोप देण्यासाठी या ठिकाणी जात आहे.
था गुरूर तुझे लम्बा होने पे ए सड़क। ग़रीब के हौंसले ने तुझे पैदल ही नाप दिया। pic.twitter.com/ct5WTt7qkn
— sonu sood (@SonuSood) May 16, 2020
”सध्यस्थितीमध्ये आपण प्रत्येक जण या संकटाला सामोरं जात आहोत. त्यामुळे या संकटकाळात आपण आपल्या कुटुंबियांसोबत रहावं असं प्रत्येकाला वाटत आहे आणि हे बरोबर आहे. या प्रवाशांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी मी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारकडून १० बसची परवानगी मिळविली आहे. मी माझं कर्तव्य करत आहे”, असं ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनू म्हणाला.
Kudos to @SonuSood for arranging for transportation and food for so many migrants to go back home. Tough times show who the true heroes are, and who just headline movies.
— Arnab Ray (@greatbong) May 14, 2020
पुढे तो म्हणतो, “हे प्रवासी आपल्या देशाचा एक भाग आहे. ते देशाच्या हृदयाचे ठोके आहे. सध्या हे प्रवासी उन्हातान्हात आपल्या कुटुंबासोबत, लहान मुलांसोबत रस्त्याने पायपीट करत आहेत, हे साऱ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे केवळ घरात एसीमध्ये बसून ट्विट करुन काही होणार नाही. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरुन ही परिस्थिती पाहिली पाहिजे. तेव्हा आपल्याला या परिस्थितीची जाणीव, त्यांचं दु:ख कळेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही, तोपर्यंत त्यांना विश्वास बसणार नाही की आपल्या मदतीसाठी कोणीतरी आहे”.
दरम्यान, देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून सोनू सतत विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक गरजुंच्या जेवणाची सोय केली आहे. तसंच त्याचे काही हॉटेल्सदेखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत.