गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर लाठ्या-काठ्या सफाईदारपणे फिरवणाऱ्या आजीबाईंचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं या व्हिडीओत सांगितलं जातंय. या आजीचं वय ८५ वर्षे असून शांताबाई पवार असं त्यांचं नाव आहे. पुण्यातल्या हडपसर परिसरात राहणाऱ्या या आजीबाईंच्या मदतीसाठी आता अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. आजीबाईंचा व्हिडीओ शेअर करत कोणाकडे तिचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक आहे का, असं त्याने ट्विटरवर विचारलंय.
‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतील’, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे. करोना संकटाच्या काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी या आजीबाईंना लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे.
Can I get her details please. Wanna open a small training school with her where she can train women of our country some self defence techniques . https://t.co/Z8IJp1XaEV
— sonu sood (@SonuSood) July 24, 2020
“मी आठ वर्षांची असताना आई वडिलांनी मला ही कला शिकवली. ती मी अजून विसरली नाही. मी शाळांमध्ये मुलांसमोर कार्यक्रम केले आहेत. परंतु नातवांनी या खेळात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे. मी घराबाहेर पडले तरच माझ्या मुलांचं पोट भरेल”, अशी व्यथा त्या आजीबाईंनी बोलून दाखवली.
अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांचा हा काठी फिरवतानाचा व्हिडीओ शेअर करत ‘वॉरिअर आजी माँ’ असं म्हटलंय. त्यानेसुद्धा मदत करण्यासाठी आजींशी संपर्क साधला आहे.