सोनी मराठी वाहिनीची पहिली पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ असे या मालिकेचे नाव असून नाथ संप्रदायाचे गुरू नवनाथ यांचे चरित्र मालिका रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे अनेकांना नवनाथ हे केवळ छायाचित्रातूनच माहिती आहेत, या निमित्ताने त्यांचे कार्य, महात्म्य जाणून घेता येईल. येत्या २१ जूनपासून या आध्यात्मिक पर्वाला सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राला नाथ संप्रदायांची मोठी परंपरा आहे. ‘करुणा आणि शक्ती’ यांचे मिलन साधणाऱ्या या संप्रदायाने आणि त्यातील नऊ गुरूंनी समाजाला अनेक दृष्टांत दिले. हरी आणि हर यांचा संगम सांधणारे अशी या संप्रदायाची ओळख आहे. मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायांचे आद्य गुरू. त्यांनतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ,  नागनाथ, चरपटीनाथ अशी देव अवतारी नऊ गुरूंची परंपरा या संप्रदायाला आहे. श्रावण मासात अनेक घरात नवनाथांचे चरित्र पारायण अनेक केले जाते. तेच चरित्र दृश्य रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम सोनी मराठी आणि निर्माते संतोष अयाचित यांनी केले आहे. संतोष अयाचित आणि पौराणिक मालिका हे समीकरण सर्वांनाच ज्ञात आहे, त्यामुळे ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात शंकाच नाही. अविनाश वाघमारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार असून नवनाथांच्या भूमिकेसाठी अनेक नव्या पण दर्जेदार कलाकारांची निवड करण्यात आल्याचे समजते.

नवनाथांवर लोकांची श्रद्धा आहे. तसेच अनेकांना त्यांचे कार्य ठाऊकही नाही. विशेष म्हणजे त्यांचे कार्य, चरित्र आपल्याकडे लिखित स्वरूपात आहेत. त्याच आधारावर ही मालिका साकारण्याचे विचाराधीन होते. सोनी मराठीने ही कल्पना सत्यात उतरवण्याची संधी दिल्याने मालिका साकारली जात आहे. या चरित्रातील अनेक गोष्टी लोकांसमोर आणणे आव्हानात्मक आहे आणि ते आम्ही स्वीकारले आहे.

– संतोष अयाचित, निर्माते

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony marathi channel legendary series coming soon akp