टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘दुव्वदा जगन्नधाम’ (डीजे)चा ट्रेलर इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या २४ तासांच्या आतच युट्यूब आणि फेसबूकवर तब्बल ७.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ च्या ट्रेलरनंतर अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
डीजेचं ट्रेलर पाहताक्षणीच अॅक्शन, डान्स, रोमान्स या सर्व गोष्टी या चित्रपटातून पाहायला मिळणार, असं हे लक्षात येत आहे. विशेषत: अल्लूच्या चाहत्यांना तो दोन वेगवेगळ्या वेषात या चित्रपटात दिसणार आहे. लुंगी आणि पांढऱ्या शर्टमध्ये एका ब्राह्मण आचाऱ्याच्या वेषात तर सूटाबूटातील ‘स्टायलिश स्टार’ म्हणूनही अल्लू दिसणार आहे.
निर्माते दिल राजू यांनी सोमवारी हैदराबादमध्ये हा ट्रेलर प्रदर्शित केला. हा अल्लू अर्जुनचा करिअरमधील २५ वा चित्रपट असल्याने दिल राजू यांनी त्याच्यासोबत काम केलेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांना या कार्यक्रमांत आमंत्रित केलं होतं. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने सुकूमार सोडल्यास दिल राजूच्या होम प्रॉडक्शन बॅनरसाठी काम केलेले सर्व दिग्दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाचा : हॉलिवूड अभिनेता जॉर्जच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन
चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या यशानंतर ऑडिओ लाँचसुद्धा लवकरच मोठ्या दिमाखात करणार असल्याचे निर्माते दिल राजू यांनी सांगितले. या चित्रपटात पूजा हेगडेसुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहे. पूजा हेगडे याआधी ‘मोहेंजोदारो’मध्ये भूमिका साकारताना दिसली होती. २३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अल्लू एक ब्राह्मण कूकची भूमिका साकारणार आहे जो एक स्पेशल एजंट असतो तर पूजा हेगडे फॅशन डिझायनरची भूमिका साकारताना दिसणार आहे.