भलेही सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे फॅनफॉलोविंग जास्त असेल. पण या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांच्या स्टार्सनीच बाजी मारल्याचे दिसून येते. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तामिळ सुपरस्टार सूर्याच्या ट्विटला ‘गोल्डन ट्वीट ऑफ २०१७’ घोषित केले गेले. त्याच्या या ट्विटला सर्वात जास्त रिट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये सूर्याने ‘थाना सेरनधा कोट्टम’ या सिनेमाचा दुसरा लूक शेअर केला होता. या ट्विटशिवाय अभिनेता विजयचा ‘मर्सल’ सिनेमा टॉप ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये होती. या हॅशटॅगने फक्त तीन दिवसांत १७ लाख ट्विट करण्यात आले होते.

मर्सलमध्ये दाखवण्यात आलेल्या जीएसटीविरोधामुळे हा सिनेमा फार गाजला होता. या वादामुळेच ‘मर्सल’ २०१७ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने जगभरात २५० कोटी रुपयांची कमाई केली. फक्त सोशल मीडियावरच नाही तर बॉक्स ऑफिसवरही दाक्षिणात्य सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

बॉलिवूड सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खानचा ‘ट्युबलाइट’ सिनेमाही चालला नाही आणि शाहरुख खानचा ‘जब हैरी मेट सेजल’ सिनेमाही चालला नाही. रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ आणि अजय देवगणचा ‘बादशाहो’ सिनेमांनीही प्रेक्षकांची सपशेल निराशा केली. तर दुसरीकडे ‘बाहुबली २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी सुमारे ४१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आतापर्यंत हिंदीमध्ये डब झालेल्या सिनेमांमध्ये सर्वात जास्त कमाई केलेला सिनेमा ठरला. आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ सिनेमाने क्रमशः २९.७८ आणि ३६.५४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘बाहुबली’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरला ज्याने फक्त १० दिवसांमध्ये जगभरात १००० कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे विजयच्या ‘मर्सल’ सिनेमाने भारतात १५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘गोलमाल अगेन’ सिनेमाने २०५ कोटी रुपये कमावले तर ‘जुडवा २’ सिनेमाने १३८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.