‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग रिलीज होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेब सीरिजमधील अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या भूमिकेवरून सुरु झालेला वाद चिघळत चालला आहे. तामिळनाडूमध्ये या वेब सरीजिला मोठा विरोध केला जात असून वेब सीरिजवर बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एवढचं नाही तर तामिळनाडूचे मंत्री टी मनो थंगराज यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित ‘द फॅमिली मॅन 2’ वेब सीरिजवर बंदी आणण्याची मागणी केलीय.
या सर्व प्रकारानंतर अभिनेत्री समंथाचे सासरे आणि साउथ सुपरस्टार नागर्जुन यांची चिंता वाढली आहे. नागार्जुन आपल्या सुनेला मुलीप्रमाणेच मानत असल्याने तिला होणाऱ्या विरोधामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. नागार्जुन यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने स्पॉटबॉयला दिलेल्या माहितीनुसार, “नागार्जुन यांना या विरोधाची कल्पना आहे. समंथाला ते आपली मुलगी मानतात आणि आपल्या मुलांना कुणी लक्ष्य केलेलं त्यांना सहन होत नाही. समंथा संकटात असल्याने ते सध्या खूप दु:खी आहेत.” असं वृत्त समोर आलंय.
का होतोय विरोध?
या वेब सीरिजमध्ये समंथा तामिळनाडूतील एका दहशतवादी संघठनेतील सदस्याची भूमिका साकारतेय. या वेब सीरिजमधील काही दृश्यांमध्ये तामिळनाडूमधील ठराविक समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. तामिळ समूदायाच्या संघर्षाचा अपमान या वेब सीरिजमध्ये केल्याचा आरोपही करण्यात आलाय. काही समूदायांनी निदर्शन करत वेब सीरिजला विरोध दर्शवला आबे. या प्रकरणी समंथाने स्पष्टीकरणही दिलं आहे. “माझ्या कुटुंबाचा काही भाग देखील तामिळ असल्याने मला तामिळनाडूच्या परंपरा आणि राजनीतीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी तामिळ लोकांचा अपमान का करेन?” असं म्हणत समंथाने तिची बाजू मांडली आहे.
वाचा: “मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे मनसुबे लक्षात यायचे”, नीना गुप्ता यांचा खुलासा
View this post on Instagram
आणखी वाचा: सुष्मिता सेनच्या लेकीने शेअर केला ग्लॅमरस फोटो; सोशल मीडियावर रिनी सेनचा फोटो व्हायरल
दरम्यान, निर्माते राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी देखील ते तामिळनाडूच्या जनतेचा आदर करत असल्याचं स्पष्ट केलंय.”लोकांनी ट्रेलरच्या आधारे वेब सीरिजच कथानक गृहित धरू नये, थोडी प्रतिक्षा करावी.” अशी विनंती केलीय.
येत्या ४ जूनला अॅमेझॉन प्राइमवर ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होत आहे.