आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारे प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम आहेत. बालसुब्रमण्यम यांना अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून खास ओळखलं जात होतं. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यामुळे बालसुब्रमण्यम यांची गाजलेली गाणी कोणती ते जाणून घेऊयात.

१. तेरे मेरे बीच में-

एकेकाळी प्रचंड गाजलेल्या गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे ‘तेरे मेरे बीच में’. कमल हासन आणि रति अग्निहोत्री यांच्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातलं हे गाणं. हे गाणं त्या काळी अफाट लोकप्रिय झालं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा स्वरसाज या गाण्याला चढला होतो. आजही हे गाणं तितक्याच आवडीने श्रोते ऐकताना दिसून येतात.

२. आ जा शाम होने आयी-
अभिनेता सलमान खान याचा आज अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचा प्रत्येक चित्रपट, चित्रपटातील गाणी हे लोकप्रिय ठरत असतात. मात्र, सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातलं आजा शाम होने आयी हे गाणं खास एस.पी.सुब्रमण्यम यांच्यामुळे लोकप्रिय झालं. हे गाणं सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या चित्रपटातील अनेक गाण्यांना सुब्रमण्यम यांनी आवाज दिला आहे.

३. सच मेरे यार –

रमेश सिप्पी यांच्या ‘सागर’ चित्रपटातलं हे गाणं आहे. हे गाणं मैत्रीवर आधारित असून यात कमल हासन, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया हे झळकले आहेत. याच चित्रपटातलं ओ मारिया हे गाणंदेखील सुब्रमण्यम यांनी गायलं आहे.

४. तुमसे मिलने की-

‘साजन’ या चित्रपटातलं प्रत्येक गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं. यातलंच एक गाणं म्हणजे ‘तुमसे मिलने की तमन्ना हैं’. या गाण्यात अभिनेता सलमान खान झळकला आहे. हा चित्रपट जितका त्या काळी गाजला. तितकीच त्यातील गाणीदेखील गाजली. या चित्रपटात सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

५. ये हसीन वादियाँ –

‘रोजा’ चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं गाणं म्हणजे ‘ये हसीन वादियाँ’. आजही हे गाणं एस.पी. सुब्रमण्यम यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.

६. साथिया ये तुने क्या किया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही एव्हरग्रीन गाणं म्हणून ‘साथिया ये तुने क्या किया’ या गाण्याकडे पाहिलं जातं. ‘लव’ या चित्रपटातं हे गाणं असून सलमान खान या गाण्यात झळकला आहे. विशेष म्हणजे आजही हे गाणं अनेक मालिकांमध्ये रोमॅण्टीक सीनच्यावेळी लावण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं.