एखादी व्यक्ती खूप दिवसांनी भेटली की आपण त्यांची आपुलकीने विचारपूस करतो. सगळं काही ठीक ना? हा ठरलेला प्रश्न विचारला की, समोरुन मस्त.. छान.. उत्तम किंवा मी काय मस्त आहे काहीच प्रॉब्लेम नाही अशी ठरलेली उत्तर येतात. आता याच ठरलेल्या एका उत्तराच्या नावावर एक सिनेमा येत आहे. स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं दुसरं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. स्पृहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.
अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
‘फिल्मी किडा निर्मित’ या सिनेमाच्या पोस्टरवर ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ असा आव ही जोडी आणते आहे… पण हे म्हणण्याइतपत असा कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात आला आहे, हे अद्याप कळलेलं नाही. या पोस्टरमध्ये निर्मिती सावंत, सीमा देशमुख, कमलेश सावंत, मंगला केंकरे यांसारखे मातब्बर कलाकार दिसत आहेत. पोस्टरमध्ये सगळे हसरे चेहरे दिसत असले तरी गश्मीरची अवस्था मात्र थोडीशी वेगळी दिसत आहे. तो थोडासा गंभीर वाटतोय तर स्पृहा गश्मीरचे कान ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरून जरी सिनेमाच विषय नक्की काय हे कळत नसला तरी यातूनच प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.
दिग्दर्शक समीर विद्वंस याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कौस्तुभ सावरकर याने पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. याआधी समीरने ‘वाय झेड’, ‘डबल सीट’ या सिनेमाचं दिग्दर्शन लेखन केले आहे. त्यामुळे समीरचा हा आगामी सिनेमा नक्की कोणत्या विषयावर भाष्य करणारा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. येत्या २८ जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.