एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ सिनेमातील शिवगामीची भूमिका सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. पण श्रीदेवीने अवाच्चा सव्वा मानधन मागितल्यामुळे शेवटी राजामौली यांनी शिवगामीच्या भूमिकेसाठी रम्या कृष्णनला घेतले. रम्याने ही भूमिका अक्षरशः जगली. श्रीदेवीने ‘बाहुबली’ सिनेमा नाकारून ‘पुली’ सिनेमा स्वीकारला होता. या सिनेमातही ती एक राणी होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला. तर बाहुबली सिनेमाने १७०० कोटींहून अधिक कमाई केली.

गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचा घटस्फोट

‘बाहुबली’ सिनेमाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर श्रीदेवीने हा सिनेमा काय विचार करून नाकारला असेल असाच प्रश्न अनेकांच्या मनात आला. हा प्रश्न फक्त सामान्यांनाच पडला असं नाही तर राम गोपाल वर्मा यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही हा प्रश्न पडला होता. पण मानधनाच्या वादामुळे श्रीदेवीने या सिनेमाला नकार दिला असे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवी या प्रश्नाचं उत्तर द्यायला सातत्याने टाळत होती. पण नुकतेच ‘मॉम’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने या प्रश्नाचे उत्तर दिले. श्रीदेवी म्हणाली की, ‘दुसऱ्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली, सिनेमाचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले आणि सुपर हिटही झाले. मग आता याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे?’ असा प्रतिप्रश्नच तिने प्रसारमाध्यमांना केला. ‘बाहुबली’ हा भारतीय सिनेसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाची क्रेझ आता थोडी कमी होताना दिसतेय. या सिनेमातल्या कलाकारांनी आता इतर सिनेमांमध्ये काम करायला सुरूवातही केली आहे.

अरे, हाच का तो ‘बाहुबली’मधला प्रभास!

‘बाहुबली २’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले आणि अजूनही काही थिएटर्समध्ये हा सिनेमा सुरू आहे. यावरूनच या सिनेमाची क्रेझ लक्षात येते. या सिनेमाने आतापर्यंत १७०० कोटींपर्यंत मजल मारली असली तरी हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित व्हायचा आहे, त्यामुळे येत्या काळात हा सिनेमा २००० कोटींपर्यंत सहज कमाई करू शकतो असा विश्वास ‘बाहुबली’च्या टीमला आहे.