श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या ‘धडक’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. धडक सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खट्टर दिसणार आहेत. दोघंही या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एकीकडे जान्हवीच्या चाहत्यांना तिच्या पदार्पणाची उत्सुकता आहे तर दुसरीकडे जान्हवी सोशल मीडियावर तिचीच चर्चा कशी होईल याकडे लक्ष ठेवून आहे.
नुकताच तिचा जिममध्ये वर्क- आऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिम इन्स्ट्रक्टरसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. तसेच पाच मिनिटांत सिक्स पॅक अॅब्स कसे करावे याच्या काही सुचना देताना ती दिसते. सध्या बोनी कपूर यांचे कुटुंबिय मॉस्कोमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना जान्हवी मात्र जिममध्ये घाम गाळत आहे.
‘धडक’ हा मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ‘सैराट’चा रिमेक आहे. शशांक खेतान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओज् या सिनेमाची निर्मिती करणार आहे. पुढच्यावर्षी ६ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
मूळ ‘सैराट’ या मराठी सिनेमात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने मुख्य भूमिका साकारली होती. रिंकूला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.