बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतणाऱ्या श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटाने चार दिवसांत १६.९२ कोटी रुपयांची कमाई केली. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करून ही माहिती दिली.
‘मॉम’ चित्रपटाने शुक्रवारी २.९० कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धिम्या गतीने सुरुवात केली. तर आठवड्याअखेर म्हणजे शनिवारपासून चित्रपटाच्या कमाईने वेग घेतला. चित्रपटाने शनिवारी ५.०८ कोटी रुपयांचा आणि रविवारी ६.४२ कोटी रुपयांचा गल्ला केला. अशा प्रकारे आठवड्याअखेर एकूण १४.४० कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी २.५ कोटींची कमाई करत चित्रपटाने चार दिवसांत एकूण १६.९२ कोटींची कमाई केली.
वाचा : ट्रोल करणाऱ्याला रेणुका शहाणेंनी शिकवला धडा
बॉलिवूडची मिस ‘हवा हवाई’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारे आहे. तिच्यासोबतच सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना या कलाकारांच्यासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात श्रीदेवी ‘देवकी’ नावाची व्यक्तिरेखा साकारत असून ती दोन मुलींची आई आहे. आपल्या मुलीसोबत घडलेल्या एका घटनेनंतर आईचा सुरु झालेला संघर्ष यात दर्शवण्यात आलाय. श्रीदेवीला चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ७ जुलै रोजी ‘मॉम’ प्रदर्शित करण्यात आला. ७ जुलै १९६७ रोजी अवघ्या ४ वर्षांची असताना श्रीदेवीने पहिल्यांदा तमिळ चित्रपटात भूमिका साकारली होती आणि आता ‘मॉम’ हा श्रीदेवीच्या करिअरमधील ३०० वा चित्रपट आहे.