जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा संबंध वर्णद्वेषाची जोडला जात आहे. परिणामी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांनी वर्षद्वेषविरोधी चळवळ सुरु केली आहे. या चळवळीला आता बॉलिवूड कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे. ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ अशा पोस्ट हे कलाकार सोशल मीडियावर करत आहेत. मात्र यावरुन अभिनेता अभय देओल याने संताप व्यक्त केला आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत झळकणारे कलाकार वर्षद्वेष चळवळीला पाठिंबा देत आहेत, असा टोला त्याने लगावला आहे.
काय म्हणाला अभय देओल?
“काही वर्षांपुर्वी भारतात गोरं करणाऱ्या क्रीम्सची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला फेअरनेस क्रीमच्या नावाखाली विकलं जाणारं हे उत्पादन आज स्किन ब्राइटनिंग, स्किन वाइटनिंग, एचडी ग्लो, व्हाइट ब्यूटी, व्हाइट ग्लो, फाइन फेयरनेस या नावांखाली विकलं जातं. आधी हा प्रकार केवळ स्त्रियांपुरता मर्यादित होता पण आता यांच्या जाळ्यात पुरुष देखील अडकले आहेत. या कंपन्या पुरुषांना ‘फेयर अँड हँडसम’ करत आहेत. भारतीय सेलिब्रिटी आज वर्षद्वेषी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पण खरंच या फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं ते थांबवतील का?” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट अभय देओलने केली आहे.
अभयने या पोस्टच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धीसाठी वर्षद्वेषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींवर टीका केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या पोस्टसाठी त्याचे कौतुक देखील केले आहे.