राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘स्त्री’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास तीन मिनिटांचा हा ट्रेलर जितका हसवणारा आहे तितकाच थरकाप उडवणारा आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका गावात ‘स्त्री’ या नावाची भूत असल्याच्या दंतकथा असतात. हीच कथा पंकज त्रिपाठी राजकुमार आणि त्याच्या मित्रांना ऐकवत असतो. दरवर्षी गावात होणाऱ्या पूजेच्या वेळी चार दिवसांसाठी ‘स्त्री’ नावाची भूत गावात येते आणि पुरुषांना ठार मारते. ही स्त्री नेमकी श्रद्धा कपूर आहे की आणखी कोण याचं रहस्य चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडेल. पण त्यादरम्यान राजकुमार आणि श्रद्धाची रोमॅण्टिक केमिस्ट्रीही यामध्ये पाहायला मिळते. तर आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारा राजकुमार या ट्रेलरमध्येही भाव खाऊन जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉरर कॉमेडी प्रकारातील ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटालाही बॉक्स ऑफीसवर प्रचंड यश मिळालं होतं. त्यामुळे आता ‘स्त्री’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.