आरती बोराडे
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात एक वेगळी कथा शोधणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड होईल. पण डान्स आवडणाऱ्या प्रेक्षक वर्गाला चित्रपट आवडेल. चित्रपटातील काही सीन्स तसेच गाणीदेखील ‘एबीसीडी’ या चित्रपटाची पुन्हा आठवण करुन देतात. चित्रपटाच्या नावाप्रमाणे चित्रपटात वेगळी कथा पाहायला मिळणार नाही. संपूर्ण चित्रपटाची कथा ही वरुण आणि श्रद्धाभोवती फिरताना दिसते. पडद्यावर ज्या ऊर्जेने आणि जोशपूर्ण वातावरणात डान्स ड्रामा सुरू असतो. तो पाहिल्यावर आपले पाय थिरकवल्याशिवाय राहत नाहीत.
चित्रपटाची कथा सहेज (वरुण धवन) पासून सुरु होते. सहेज आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत असतो. पण तो मुळचा भारतीय असतो. त्याचा मोठा भाऊ इंदर (पुनित) पायाच्या गुडघ्याला झालेल्या जखमेमुळे डान्स स्पर्धा हारतो. त्याचे ती स्पर्धा जिंकणे हे स्वप्न असते. सहेज त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात येऊन पैसे जमा करतो आणि लंडनमध्ये स्वत:चा डान्स स्टुडियो उघडतो. त्यानंतर इंदरची संपूर्ण टीम ‘स्ट्रीट डान्सर’ पुन्हा एकदा एकत्र येते. पण लंडनच्या या गल्लीमध्ये पाकिस्तानी डान्सर्सची देखील ‘रुल ब्रेकर’ ही एक टीम असते. त्यांची प्रमुख इनायत (श्रद्धा कपूर) असते. दोघांमध्ये डान्सपासून ते भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅचपर्यंत अनबन सुरु असते. त्या दोघांमधील टशन चित्रपटाच्या संपूर्ण पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते.
चित्रपटात अण्णाच्या (प्रभूदेवा) एण्ट्रीने कथेला इमोशनल ट्रॅकची साथ मिळते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊन एका सत्कर्म ध्येयासाठी डान्स करु लागतात. पण ते एकत्र का येतात? त्यांचे ध्येय नेमकं काय असतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की पाहावा लागेल.
‘स्ट्रीट डान्सर’ हा ‘एबीसीडी’ मालिकेतीलच चित्रपट आहे. पण काही कारणास्तव चित्रपटाचा मूळ गाभा तोच ठेवून चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. रेमो डिसूजाचा ‘स्ट्रीट डान्सर’ हा सहावा चित्रपट आहे. रेमोचा डान्स ही जमेची बाजू असली तरी चित्रपटातून उत्तम कथा सांगण्याचा प्रयत्न रेमोने केला आहे. तसेच चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे आणि या निवडीसाठी रेमोचे कौतुक करायला हवे.
वरुण धवनचा चित्रपटातील अभिनय फारसा प्रेक्षकांना आवडेल असे वाटत नाही. पण अनेक प्रसंगामधील त्याचे बोलके डोळे खूप काही सांगून जातात. तसेच वरुणचा डान्स पाहण्यासारखा आहे. चित्रपटातील मुख्य नायिका श्रद्धा कपूरने उत्तम भूमिका साकारली आहे. तसेच तिचा डान्स देखील अतिशय सुंदर आहे. पण अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्स कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. तिचा ‘हाय गर्मी’ या गाण्यावरीव डान्स अप्रतिम असल्यामुळे ती चित्रपटात भलताच भाव खाऊन जाते. चित्रपटात धर्मेश, राघव, सलमान यांच्या डान्सने तर जादूच केली आहे. पण पुनित पाठकच्या चाहत्यांची चित्रपट पाहताना निराशा जरुर होणार. प्रभूदेवाच्या एण्ट्रीने तर चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट ऐकू येतो. तसेच त्याचे ‘मुकाबला’ हे गाणे प्रेक्षकांना थिरकायला लावतो.
पूर्वाधामध्ये काही वेळानंतर चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो. पण मध्ये मध्ये येणाऱ्या डान्समुळे प्रेक्षकांना खूर्चीत खिळवून ठेवतो. तसेच चित्रपटातील संवाद साधे आणि सरळ आहेत. चित्रपटात वापरण्यात आलेल्या काही स्पेशल इफेक्टमुळे चित्रपट 3D मध्ये पाहण्यास मज्जा येते. चित्रपटात वापरण्यात आलेली रंगसंगती खूप आकर्षक आहे. एकंदरीत रेमोला या चित्रपटासाठी चांगले यश मिळेल.
लोकसत्ता ऑनलाइनकडून ‘स्ट्रीट डान्सर 3D’ला चार स्टार
-aarti.borade@loksatta.com