”मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. उद्धवसाहेबांचा माझ्यावर विश्वास आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांची मुलाखत घेणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे”, असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे यांने फेसबुक पोस्टद्वारे दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी गेल्या आठवड्यात संवाद साधला. यावेळी अभिनेता सुबोध भावेने राहुल गांधी यांची मुलखात घेतली होती. या मुलाखतीनंतर अनेक चर्चांना उधाण आल्यानं सुबोधनं आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
”मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदरानं आणि प्रेमानं वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत. आजपर्यंत मी मोहनजी भागवत, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, राज साहेब, रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानं भेटलो आणि त्यांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्याच आदर आणि प्रेमाने भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला”, अशी पोस्ट लिहित राहुल गांधी यांची मुलाखत घेणे हा केवळ कामाचा भाग असल्याचं सुबोधनं स्पष्ट केलं आहे.
सुबोध भावे हा शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतल्यानं अनेक चर्चा रंगू लागल्या. यावर स्पष्टीकरण देत ”मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर ही जबाबदारी देणाऱ्या उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे.’ ‘, असं सुबोध म्हणाला.
राहुल गांधी यांच्या मुलाखतीदरम्यानं मला तुमच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचंही सुबोध मिश्कीलपणे म्हणाला होता. त्यानंतर सुबोध राहुल गांधींच्या भूमिकेत दिसणार की काय अशाही चर्चांना पेव फुटलं मात्र कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला हे देखील सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.