मराठीचा आघाडीचा अभिनेता सुबोध भावे जेव्हा ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आला, तेव्हा प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच ठरली. या मालिकेत त्याने साकारलेल्या विक्रांत सरंजामेच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता सुबोध पुन्हा कधी छोट्या पडद्यावर परतणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिला आहे. इन्स्टाग्रामवर सुबोधने मंगळवारी चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यादरम्यान एकाने ‘तुला पाहते रे’ नंतर कोणती मालिका करणार हा प्रश्न विचारला होता.

चाहत्याच्या या प्रश्नावर सुबोध म्हणाला, ‘इतक्यात तरी नाही’. सुबोध सध्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकात व्यग्र आहे. त्यामुळे तो छोट्या पडद्यावर इतक्यात तरी परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘तुला पाहते रे’ मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुबोध ३५ हजार रुपये इतकं मानधन घेत होता. या मालिकेसाठी सुबोधने होकार दिला तरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचं वाहिनीने निर्मात्यांना सांगितलं होतं. पण कथा वाचताक्षणी सुबोधने मालिकेला होकार दिला होता.

Story img Loader