अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांनंतर अभिनेत्री सुचित्रा बांदेकर लवकरच रंगभूमीवर परतणार असल्याची माहिती मिळतेय. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कुत्ते कमीने’ या नाटकात सुचित्रा महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. जवळपास २० वर्षांनंतर सुचित्रा रंगभूमीवर परतणार आहेत. २० वर्षांपूर्वी ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकानंतj मालिका आणि चित्रपटांत त्या व्यग्र झाल्या होत्या.
याबाबत सुचित्रा म्हणतात की, ‘जरी २० वर्षांनंतर मी नाटकात काम करीत असले तरी मी नाटकापासूनच कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने मी नाटकात काम करू शकले नव्हते. नाटकात पुनरागमन करताना मला खूप आनंद होतोय.’
‘कुत्ते कमीने’ या नाटकाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. पुन्हा एकदा नाट्यरसिकांची सेवा करण्याची संधी मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचं सुचित्रा सांगतात.
वाचा : अर्जुन, तू चित्रपटसृष्टीत १०० वर्षांपासून असल्यासारखं वागू नकोस- वरुण
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या मराठी चित्रपटात आणि ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली. रंगभूमीवर काम केलेला कलाकार नाटकांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे आता २० वर्षांनंतरही सुचित्रा बांदेकर रंगभूमीकडे वळल्या आहेत.