सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांचीच चलती असल्याचे दिसते. तैमुर अली खान, आर्यन खान, आराध्या बच्चन, मिशा कपूर, आझाद राव खान, अब्राम खान, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर या सर्व स्टार किड्सची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकार तत्पर असतात. याच स्टार किडपैकी एक म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना.

वाचा : प्रभासचे मानधन ऐकून करण जोहरची बोलती बंद!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुखची लाडकी लेक सुहाना ही लंडनमध्ये शिकते आहे. सुहानाचे तिच्या वडिलांप्रमाणेच अनेक चाहते असून, तिच्या नावाचे काही फॅनपेजही आपल्याला सोशल मीडियावर पाहावयास मिळतात. सध्या भारतात आलेली ही स्टार किड तिच्या मैत्रिणींसोबत फिरताना दिसली. तसेच, गौरी खाननेही इन्स्टाग्रामवर सुहानाचा एक सुंदर फोटो काल शेअर केला होता. पण, त्यानंतर या फोटोवरून नेटिझन्सनी सुहानाला ट्रोल करण्याचा प्रकार घडला.

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट शेअर केल्यानंतर त्यावर लगेचच प्रतिक्रिया आणि आपली मतं मांडण्यास सुरुवात होते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग यामधून सुहानाच्या फोटोला तरी कसे वगळण्यात येईल. काहींना तिचा फोटो आवडला तरी काही नेटिझन्सनी त्यावर टीका केली. एका नेटिझनने सुहानाची खिल्ली उडवत लिहिलं की, ‘ही स्त्री रुपातील शाहरुख असल्याचे वाटते ना? हा विनोदाचा भाग झाला’. तर एकाने लिहिलं की, ‘फीमेल शाहरुख…. ही सर्व मेकअपची कमाल आहे. विनामेकअप ती फार वाईट दिसते. अभिनेत्री होण्यासाठी ती किती उत्सुक आहे हे आपल्या सर्वांनाच माहितीये. काहीही झालं तरी तुम्ही दोघं (शाहरुख आणि गौरी) तिला लाँच करालच. घराणेशाही.’

वाचा : मायावती यांना जादूची झप्पी देईन; संजूबाबाला न्यायालयाचा समन्स

आपल्या मुलांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांच्या इच्छांचा आदर करणाऱ्या शाहरुखने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने सुहानाच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा करत जर तिला बॉलिवूडमध्ये यायचे असेल तर त्यावर आपली काहीच हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्याआधी तिने आपले शिक्षण पूर्ण करावे ही एकमात्र अट त्याने मुलीसमोर ठेवल्याचेही सांगितले.