बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचं नाव मोठं आहे. इतकंच काय त्याच्या सगळ्याच गोष्टीही भव्य असतात. म्हणूनच की काय त्याला किंग खान असेही म्हटले जाते. आता किंग म्हणजे राजाची लाइफस्टाइल ही महागडी नसेल तर नवलच. जेवढी महागडी शाहरुखची लाइफस्टाइल तेवढीच किंबहुना त्याहून जास्त महागडी लाइफस्टाइल त्यांच्या मुलांची आहे. आर्यन, सुहाना आणि अब्रामला आवडलेली कोणतीही गोष्ट विकत घेण्यात त्यांना अडथळे येत नाहीत.

नुकताच सुहाना पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे बूट घालून मैत्रिणींसोबत फिरताना दिसली. तिच्या या बुटांची किंमत जवळपास ६४ हजार रुपये इतकी होती. कोणताही सर्वसामान्य माणूस बुटांवर एवढे रुपये खर्च करणे केवळ अशक्यच. पण सुहाना ही काही सर्वसामान्य मुलगी नाहीच. ती किंग खानची मुलगी आहे, त्यामुळे जगभरात तिला जे काही आवडेल ते ती किंमत न पाहता घेऊ शकते.

१७ वर्षीय सुहानाला काल गेट वे ऑफ इंडियाकडे पाहण्यात आले. ती आपल्या मित्र- परिवारासोबत बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलिबागच्या फार्महाऊसवर जाताना दिसली. यावेळीही तिच्या फॅशन सेन्सने तिने प्रसारमाध्यमांचे लक्ष स्वतःकडे वळवण्यात यश मिळवले होते. यावेळी तिने गिवेंची (Givenchy) ब्रॅण्डचे टी-शर्ट घातले होते. यासोबत तिने पांढऱ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स आणि स्निकर घालून आपला हॉट लूक पूर्ण केला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की तिच्या टी-शर्टचीच किंमत फक्त ५०,२०० रुपये आहे. तिच्या शॉर्ट्स आणि स्निकर्सची किंमत तर न विचारलेलीलच बरी.

काही दिवसांपूर्वी गौरीने सुहानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तिच्या या फोटोवरुन सुहाना चांगलीच ट्रोल झाली होती. तसेच सुहानाचा स्विमसूटमधला फोटो चांगलाच चर्चेत आला होता. तिच्या या फोटोवर युजर्सनी अनेक वाईट कमेंट लिहिल्या होत्या. सुहाना ट्रोल होतेय हे पाहून शाहरुखने पुढाकार घेत म्हटले की, सुहाना एक लहान मुलगी आहे तिला त्याच पद्धतीने पाहा. ती शाहरुख खानची मुलगी आहे म्हणून तिला ट्रोल करु नका. या घटनेनंतर सुहाना सोशल मीडियापासून काहीशी लांबच गेली होती.