राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेचा आगामी ‘केसरी – saffron’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका सर्वसामान्य घरातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि ते पूर्णत्वास कसे नेतो याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विराट मडके हा मुख्य भूमिका साकारत असून तो पहिल्यांदाच मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी नायकाने घेतलेली मेहनत, त्याच्या मार्गात आलेल्या अनेक अडीअडचणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कुस्तीगिरांसाठी कसरत आणि खुराकासाठी लागणारा खर्च सरकार करत होते. परंतु या खेळांना आता नावापुरता राजाश्रय उरला आहे. कुस्ती रांगडा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य घरातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो. मात्र घरची परिस्थिती नसल्यामुळे त्याला वडिलांचा विरोध असतो. तर गावातील काही जणदेखील त्याला सतत हिणवत असतात. मात्र या साऱ्यावर मात करत तो महाराष्ट्र केसरी जिंकतो.

दरम्यान, या चित्रपटामध्ये विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, नंदेश उमप या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. केसरीमध्ये महेश मांजरेकर वस्तादाच्या भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या अस्सल मातीतील या चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले असून संकलन आणि दिग्दर्शन सुजय डहाकेचे आहे. हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader