सोनी टीव्हीवरील रिअॅलीटी शो इंडियन आयडल गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी यांनी या शोवर नाराजी दर्शवल्यानंतर या चर्चांना उधाण झालं. त्यानंतर इंडियन आयडलच्या पहिला पर्वाचा विजेता अभिजीत सावंतनेही या शोवर नाराजी दर्शवली होती. यानंतर आता सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने एक मोठा खुलासा केला आहे.
सुनिधी चौहानने इंडियन आयडलच्या पाचव्या आणि सहाव्या सिझनमध्ये जजची भूमिका साकारली होती. ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सुनिधी चौहानने शोवरून सुरु असलेल्या चर्चांवर खुलासा केलाय. या शो दरम्यान सुनिधीला स्पर्धांकांचं कौतुक करण्यास सांगण्यात आलं होतं असं ती म्हणाली. ” अगदी सगळ्यांचच कौतुक केलं पाहिजे असं सांगण्यात आलं नव्हंत, मात्र हो कौतुक करण्यास सांगण्यात आलं होतं.” मेकर्सना अपेक्षित असलेलं सर्वकाही सुनिधी करू शकली नाही आणि त्यामुळेच तिला शोपासून दूर जावं लागलं असा खुलासा सुनिधीने केलाय.
View this post on Instagram
या मुलाखतीत सुनिधीने इंडियन आयडलचे जज नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांच्याबद्दलही भाष्य केलं. हे तिनही जज स्पर्धकांच्या चुका सुधारत नाहीत, सकारात्मक टीका करत त्यांना सुधारण्याचा प्रश्न तर सोडाचं असं सुनिधी म्हणाली. ती म्हणाली, “आपल्याला अमित कुमार यांच्या त्या मुलाखतीला विसरुन चालणार नाही. ज्यात त्यांनी खुलासा केला होता की कॅमेरासमोर जाण्याआधी त्यांना प्रत्येक स्पर्धकाचं कौतुक करण्यास सांगण्यात आलं होतं. यांचा हेतू काय आहे? इंडियन आयडलचे मेकर्स हा शो फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत का?” अशी नाराजी सुनिधीने व्यक्त केलीय.
इंडियन आयडलचे मेकर्स केवळ प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी असं करत असावे किंवा प्रेक्षकांनी या शोसोबत जोडलेलं राहावं म्हणून असं केलं जातं असावं असं सुनिधी म्हणाली. या सर्वात खरं कौशल्य असणाऱ्या एका गायकाचं मोठं नुकसान होतं असल्याचं दु:ख सुनिधीनी व्यक्त केला आहे.