स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण केले तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून लवकरच पदार्पण करणार आहे. दुसरीकडे सुहाना खान, आर्यन खान, आहाना पांडे यांसारखे स्टारकिड्स येत्या एक- दोन वर्षात रुपेरी पडद्यावर झळकतील. याच यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दिग्दर्शक साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली. ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार नुकतेच विकत घेतले आहेत. मिलन लुथरिया यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘बादशाहो’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
IT'S OFFICIAL… Sajid Nadiadwala ropes in director Milan Luthria for Ahan Shetty’s debut… An official remake of #Telugu hit #RX100. pic.twitter.com/AliZIgcFCS
— taran adarsh (@taran_adarsh) November 15, 2018
२०१९च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तरुणवर्गात फार लोकप्रिय असून त्याचा हिंदी रिमेकसुद्धा तरुणाईला आकर्षित करणार अशी आशा आहे, असं साजिद म्हणाले. विशेष म्हणजे साजिद यांनीच सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. ‘वक्त हमारा है’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.