टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कॉमेडियन्स कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आता सर्वांनाच कळला आहे. ऑस्ट्रेलियाहून परतताना विमानात कपिल आणि सुनीलदरम्यान झालेला वाद अनेकदा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर कपिलने अनेकदा सुनीलला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतण्याची विनंती केली. गुरुवारी सुनील ग्रोवरचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने कपिलने त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. तुला जगातील सर्व सुख मिळो अशा शब्दात त्याने शुभेच्छा दिल्या.
कपिलच्या या ट्विटनंतर कपिल आणि सुनीलमधील वाद निवळला असा काहींनी अर्थ काढला तर काहींनी कपिलने गेल्या वर्षी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांशी या ट्विटची तुलना केली. आता सुनीलने कपिलच्या ट्विटला उत्तर दिलंय आणि या ट्विटने पुन्हा एकदा दोघांच्या चाहत्यांचं लक्ष वेधलंय. ‘नेहमी खूश आणि निरोगी राहा’ असं म्हणत सुनीलने कपिलचे आभार मानले.
Thanks Bhaji! Stay happy and healthy. Love. https://t.co/MBFMWaUy94
— Sunil Grover (@WhoSunilGrover) August 3, 2017
Wish u a very happy birthday @WhoSunilGrover paji … may god bless u with all the happiness of this world. Lots of love always 🙂
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) August 3, 2017
गेल्या काही दिवसांपासून कपिल आजारी असल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे सुनीलचं निरोगी राहा म्हणणं हे साहजिक होतं. तब्येत बरी नसल्याने अनेकदा कपिलला शूटिंग रद्द करावं लागलं होतं. ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘मुबारका’ चित्रपटाच्या टीमला कपिलच्या सेटवरुन परतावं लागलं होतं.
‘द कपिल शर्मा शो’ मधून बाहेर पडलेल्या सुनीलची आजही प्रेक्षक आठवण काढतात. त्याने पुन्हा या शोमध्ये यावं अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे. कपिलनेही फेसबुक लाइव्हदरम्यान सेटवर सुनीलची कमतरता भासत असल्याचं स्पष्ट केलं होतं.