कॉमेडियन सुनील पालने फेसबुकवरुन ‘मुबारका’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बाज्मी यांच्यावर आरोप केले आहेत. बाज्मी यांच्यावर मानधन न देण्याचा आरोप करत तीन मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. आता सुनीलच्या या आरोपांना दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी उत्तर दिलंय. ‘सुनील पाल कोणतेही मानधन देण्याच्या लायकीचा नाही,’ अशा शब्दांत बाज्मी यांनी उत्तर दिलंय.

”मुबारका’ची शूटिंग सुरु होण्यापूर्वी एका फॅमिली गॅदरिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी बाज्मी यांनी मला विचारलं होतं’, असं सुनीलने फेसबुकवरील व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे ‘मुबारका’ हा एक फ्लॉप चित्रपट असल्याचंही त्याने म्हटलं. ‘अनीस याच लायकीचे आहेत. ते कलाकारांचा अपमान करत होते. शोसाठी जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा ते माझा फोनच उचलत नव्हते,’ असे सुनीलने सांगितले. या व्हिडिओमध्ये सुनिलने बाज्मी यांचा सहकारी मयूर बरोतवरही आरोप लावले.

दुसऱ्या बाजूस अनीस यांचे म्हणणे आहे की त्यांचा त्या फॅमिली गॅदरिंगशी काहीही संबंध नाही. ‘मी फक्त मयूरसाठी त्या शोचं दिग्दर्शन केलं होतं. कार्यक्रमादरम्यान सुनील खूप दारू प्यायलेला होता आणि यामुळेच तो मानधनाच्या लायकीचा नाही,’ असे ‘डीएन’ला दिलेल्या मुलाखतीत बाज्मी म्हणाले.

PHOTO : अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक

सुनीलसंदर्भात बाज्मी पुढे म्हणाले की, ‘माझ्या कार्यालयात रोज काम मागण्याासाठी येणाऱ्यांमध्ये सुनिलचा समावेश आहे. माझ्या एखाद्या चित्रपटात मी त्याला काम देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र मुबारका चित्रपटात सुनीलसाठी कोणतीच भूमिका नव्हती. समस्या निर्माण करणाऱ्या आणि प्रसिद्धीसाठी काहीही करणाऱ्यासोबत मला आता काम करायचे नाही.’