गेल्या आठवड्यात सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कार्यक्रम बंद झाल्याची बातमी ऐकून अनेकांचीच निराशा झाली. कपिलने त्याच्या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि आता अचानक त्याचा शो बंद होणार असल्याने अनेकांनाच वाईट वाटतंय. कॉमेडियन सुनील पालने फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड करत आपलं दु:ख व्यक्त केलंय. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरला त्याने या व्हिडिओतून संदेश दिलाय.
या व्हिडिओमध्ये सुनील म्हणतोय की, ‘कपिल शर्माचा शो बंद झाल्याची बातमी कळली. शोची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती, याचाच ताण आल्याने तो आजारी पडला. त्याला जणू कोणाची नजरच लागली आहे. सुनील ग्रोवर आणि कपिलला मी यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही दोघे कॉमेडीच्या वाहनाची दोन चाकं आहात. तुमच्यामुळे कॉमेडीला ओळख आहे. तुम्ही दोघांनी मिळून काम केलंत तर कॉमेडीला खूप पुढे नेऊ शकाल. आता शो बंद पडल्याने तुम्हाला आनंद मिळाला का?’ या व्हिडिओमध्ये सुनील भावूकही झाला.
कपिलची तब्येत बरी नसल्याने काही सेलिब्रिटी त्याच्या सेटवरुन परतल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. या शोचा एकही नवीन एपिसोड चित्रीत न झाल्यामुळे वाहिनीला याचा फटका सातत्याने बसत होता. त्यामुळेच ‘द कपिल शर्मा शो’ला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला. याचाच फायदा उचलत ‘स्टार प्लस’ वाहिनी ९ वर्षांनंतर एक शो पुन्हा सुरु करतेय, जिथून सुनील पाल, कपिल शर्मा आणि एहसान कुरेशी यांसारख्या कॉमेडीयन्सनी आपल्या करिअरची सुरुवात केलेली. या शोमध्ये आता अक्षय कुमार आणि कॉमेडीयन झाकीर खान परीक्षक म्हणून दिसतील. झाकीर खानचा एक युट्यूब चॅनल आहे ज्यावर तो कॉमेडीचे व्हिडिओ पोस्ट करतो. त्याच्या युट्यूब चॅनलमुळे सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
वाचा : …म्हणून सलमानने तोडला चाहत्याचा फोन
सुनील पालने आपल्या व्हिडिओतून अप्रत्यक्षपणे झाकीर खानवरही निशाणा साधलाय. ‘कॉमेडीची धुरा आता त्या तथाकथिक लोकांच्या हातात आलीये. ही लोकं कॉमडीच्या नावावर टॉयलेट, बाथरुमसारखे विषय काढत मर्यादा ओलांडतात. अशा सहा-सात कॉमेडियन्सचे युट्यूब चॅनल दहा टक्के बेजबाबदार तरुणांकडून सबस्क्राईब आणि लाईक केले जातात,’ असंही तो म्हणाला.