अभिनेता सनी देओलचा मुलगा करण लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं वृत्त काही महिन्यांपूर्वीच आलं होतं. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत तो दिसणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. मूळची शिमला येथे राहणारी अभिनेत्री साहेर बांबा यामध्ये करणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मनालीमध्ये सुरू असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून करण मुंबईला परतल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलं आहे.
शूटिंगदरम्यान काही साहसदृश्ये करताना करणच्या पायाला दुखापत झाली असल्याने शूटिंग अर्धवट सोडून त्याला मुंबईला परतावे लागले आहे. सनी देओल सध्या मनालीतच असून उर्वरित शूटिंगचं काम पूर्ण करण्यात व्यग्र आहे. मुख्य अभिनेता करण नसल्याने साहेर सुट्टी घेऊन शिमलाला रवाना झाल्याचं कळतंय. करण बरा होऊन पुन्हा सेटवर आल्यावरच ती शूटिंगसाठी परतणार असल्याचं म्हटलं जातंय. दुखापतीतून बरं होण्यासाठी करणला दहा ते बारा दिवस लागणार असून, डॉक्टरांनी त्याला पूर्णवेळ आराम करण्यास सांगितले आहे.
वाचा : ‘पद्मावती’चा ट्रेलर पाहून हृतिक, अनुष्का, करण जोहरही झाले मंत्रमुग्ध
‘पल पल दिल के पास’ हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून देओल प्रॉडक्शन हाऊस आणि झी स्टुडिओ मिळून याची निर्मिती करत आहेत. सनीचा सुपरहिट चित्रपट ‘गदर’ची निर्मितीही झी स्टुडिओनं केली होती. आता पुन्हा झी स्टुडिओच्या माध्यमातून करणचा चित्रपट येत असल्याने सनीसह त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.