अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियलने काही दिवसांपूर्वीच लातूरच्या एका मुलीला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्विकारले. निशा कौर वेबर असे नाव असणाऱ्या या मुलीचे संगोपन करण्यात सध्या दोघेही चांगलेच रुळले आहेत. मात्र सनी आणि डॅनियलला याप्रकरणी आता सोशल मीडियाचा फटका बसला आहे असे म्हणावे लागेल. राष्ट्रीय बाल आयोगाने दोघांनाही जेजे अॅक्टच्या उल्लंघनप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे. निशाला दत्तक घेण्याची प्रक्रिया कोर्टात सुरु असताना सनीने नियमाचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे.

सनी आणि तिचा पती डॅनियलने गेल्या महिन्यात केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाकडून (कारा) निशाला दत्तक घेतले. तिला दत्तक घेण्याची प्रक्रिया पू्र्ण होण्याआधीच सनी आणि दत्तक देणाऱ्या संस्थेने निशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे म्हटले जात आहे. ३० सप्टेंबर २०१६ मध्येच सनी आणि डॅनियलने मुलीला दत्तक घेण्यासाठी अर्ज केला होता. ३१ जून २०१७ रोजी मुलीसोबत त्या दोघांची ऑनलाइन मॅचमेकिंग करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया सुरु झाली. जुलैमध्ये सनीने मुलीला दत्तक घेतले आणि तेव्हाच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावेळी दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

वाचा : माधुरी दीक्षित करणार मराठीत पदार्पण

याप्रकरणी राज्य बाल संरक्षण समितीचे सदस्य विभांशू जोशी यांनी राष्ट्रीय बाल आयोग आणि केंद्रिय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्याकडे तक्रार केली. यामध्ये सनी आणि दत्तक देणाऱ्या संस्थेने जेजे अॅक्टचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरुन राष्ट्रीय बाल आयोगाने सनी लिओनीला नोटीस पाठवून ३० दिवसांत उत्तर मागितले आहे. आयोगाने ‘कारा’कडूनही उत्तर मागितले आहे. आता यावर सनी आणि दत्तक देणारी संस्था काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.