पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनीला यंदाचं वर्ष खऱ्या अर्थाने महत्वाचं ठरलं आहे. गेल्या काही काळापासून सनी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. त्यातच तिच्या जीवनावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. त्यातच तिचा आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक गोष्ट ठरली आहे. भारताच्या गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त वेळा सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये सनीने प्रथम स्थान पटकावलं आहे. इतकंच नाही तर यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील मागे टाकलं आहे.

गुगलवर सर्वाधिक जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये सनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान खान आणि शाहरुख खान यांना मागे टाकलं आहे. गुगल ट्रेंड्स अॅनालिटिक्समध्ये, या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सनी लिओनीला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

गुगल ट्रेण्ड्स अॅनालिटिक्सनुसार, सोशल मीडियावर सनी लिओनीसंदर्भात अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या. यामध्ये तिचे फोटो, व्हिडीओ आणि तिचा काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला बायोपिक हे जास्त वेळा सर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मणिपूर आणि आसाम या राज्यामध्ये तिच्याविषयीची माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली.

“गुगल ट्रेण्ड्समध्ये मी प्रथम स्थानावर असल्याची माहिती मला माझ्या टीमने दिली. माझ्या या लोकप्रियतेचं सगळं श्रेय मी माझ्या चाहत्यांना देते. हे चाहते कायम माझ्यासाठी उभे राहतात. त्यामुळे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे”, असं सनीने सांगितलं. विशेष म्हणजे सनीची लोकप्रियता ही गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीदेखील गुगल ट्रेण्ड्स सनीला सर्वाधिक वेळा  सर्च करण्यात आलं होतं.