बिग बॉसच्या घरातून बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते. ‘रईस’ चित्रपटातील शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर सनी आता कॅनेडियन पॉप गायक जस्टीन बिबरसोबत परफॉर्मन्स करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, मुंबईत रंगणाऱ्या जस्टीनच्या कार्यक्रमात सनी ठुमके लगावणार का? यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या एका खास कामासाठी सनीने आपल्या नैमित्तिक कामातून सुट्टी घेतल्याचे समजते. खास काम म्हणजे सनी सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडू शकतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्हाला तिचे खास काम कळेल तेव्हा आश्चर्यच वाटेल.
सनीने पुन्हा अभ्यासाचे धडे गिरविण्याचा ध्यास घेतला असून ती स्वत:ला अपडेट करण्यासाठी विशेष शिक्षण घेणार आहे. सनी संपादन आणि पटकथा लेखन शिकण्यासाठी विशेष कोर्स करण्याचे ठरविले आहे. हे प्रावीण्य संपादन करण्यासाठी तिने लॉस एंजेलिसमधील एका प्रसिद्ध संस्थेत प्रवेश घेतला असून तिच्या क्लासमध्ये हॉलिवूडमधील दिग्गजांचा समावेश आहे. ‘रईस’ चित्रपटातील आयटम गाण्यावर ठिरकल्यानंतर ती सध्या चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टीबाबत स्वत:ला अपडेट करण्याचा प्रयत्न करते आहे. स्क्रिप्ट रायटिंग आणि एडिटिंगच्या कोर्सविषयी सनी म्हणाली की, बऱ्याच दिवसांपासून मला या गोष्टी शिकण्याची इच्छा होती. पण वेळ नसल्यामुळे मी ही गोष्ट पूर्ण करु शकत नव्हते. नवीन काही तर शिकण्याची इच्छा आता पूर्ण होत असून पुन्हा शाळेत जाण्यासाठी मी उत्सुक आहे.”
सनी लिओनीच्या या इच्छेमुळे तिच्यात अभिनयाशिवाय अन्य गोष्टी शिकण्याची जिज्ञासा दिसून येते. सनीच्या बॉलिवूडप्रवासाबद्दल बोलायचे तर सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या व्यासपीठावरुन तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले. काही चित्रपटात काम केल्यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आपल्या चित्रपटातील आयटम साँगमध्ये सनीच्या नावाला निश्चितच प्राधान्य देतो. यावरुन बॉलिवूडमध्ये सनीला चांगलीच मागणी असल्याचे दिसते. नव्या अभ्यासातून ती चित्रपटसृष्टीत आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी करायला लागली आहे, असेच म्हणावे लागेल.