‘रजनीकांत’ या नावाची जादू काय आहे, हे काही वेगळं सांगायला नको. दाक्षिणात्य राज्यांमध्ये हे नाव जरी उच्चारलं तरी लोकं आदराने त्यांच्याबद्दल बोलतात. रजनीकांत यांच्यासाठी त्यांचे चाहते एवढे वेडे आहेत की ते फक्त रजनीकांत यांच्या पोस्टर्सची पूजाच करतात असं नाही तर त्यांना तिथल्या चाहत्यांनी देवच मानले आहे. सोमवारी रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. पण आज आम्ही तुम्हाला रजनीकांत यांच्या अशा एका चाहत्याबद्दल सांगणार आहोत.

श्रीनिवासन जयसीलन सांगतात की, ‘चेन्नईमध्ये रजनीकांत यांना भेटणे जवळ जवळ अशक्यच असतं. त्यांच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असते. २०१४ मध्ये जेव्हा मला कळलं की, रजनीकांत त्यांच्या ‘लिंगा’ या सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी हाँगकाँगला जाणार आहेत. तेव्हा आम्ही रजनीकांत यांना विमानात भेटता येईल म्हणून त्याच विमानाची तिकीटं खरेदी केली.’ रजनीकांत यांच्या भेटीसाठी श्रीनिवासन यांनी दीड लाख रुपये मोजले.

पुढे ते म्हणाले की, ‘माझ्या देवासमोर पैशांची काहीच किंमत नाही. ज्या हवेत रजनीकांत श्वास घेतात त्याच हवेत आम्हाला श्वास घेता आला हेच आमचे भाग्य आहे. आम्हाला अजून काय हवंय. ते फारच विनम्र आहे. ते स्वतःच्या खूर्चीवरून उठले आणि माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला तिथे बसायला सांगितलं. ते आमच्याशी २० मिनिटं बोलत होते. माझ्या बायकोने तर त्यांना चष्म्याची ‘सिग्नेचर स्टेप’ही करायला सांगितली. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी अनमोल आहे.’

श्रीनिवासन यांनी रजनीकांत यांनी वापरलेला चष्मा आपल्याकडे जपून ठेवला आहे आणि त्याला कोणालाही हात लावू देत नाही. त्यांचे कुटुंबिय त्याच रात्री हाँगकाँगवरून चेन्नईला आले. त्यांनी ही ट्रीप फक्त रजनीकांत यांच्यासाठीच आखली होती. रजनीकांत या कुटुंबाला सांगत होते की, ‘माझ्यावर एवढे पैसे खर्च करू नका. कुटुंबासाठी वापरा.’ याशिवाय रजनीकांत यांनी विमान प्रवासादरम्यान वापरलेले आय मास्कही श्रीनिवास यांना भेट म्हणून दिले. हा मास्कही श्रीनिवास यांनी फार जपून ठेवला आहे.