अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेली ‘तांडव’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचा वाद सुरु असतानाच लोकप्रिय ठरलेली ‘मिर्झापूर’ या सीरिजसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मिर्झापूर सीरिजबद्दल आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मालिकेच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने ‘मिर्झापूर’ विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मिर्झापूरच्या निर्मात्यांना आणि अॅमेझॉन प्राइमला नोटीस पाठवली.

‘मिर्झापूर’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे समाजात तेढ होण्याची शक्यता आहे. तसंच या सीरिजमुळे ‘मिर्झापूर’ची प्रतिमा मलीन होत असून, जिल्ह्याचं वाईट चित्र रंगवण्यात आलेलं आहे. सीरिजमधून धार्मिक आणि समाजिक भावना दुखावल्या असल्याचं याचिकाकर्ते अरविंद चतुर्वेदी यांनी याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीरिजच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. यापूर्वी अनेकांनी ‘मिर्झापूर’वर आरोप केले असून याप्रकरणी आता रितेश साधवानी, फरहान अख्तर, भौमिक गोडलिया आणि अॅमेझॉन प्राइमविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- ‘तांडव’ विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

ऑक्टोबर २०२० मध्ये ‘मिर्झापूर’ या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या सीजनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. अनेकांनी टीकेची झोड देखील उठवली. विशेष म्हणजे या सीरिजला बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मीडियावर करण्यात आली होती.

आणखी वाचा- कंगना रणौतच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स

‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिकेत झळकले आहेत. कालीन भैय्या, मुन्ना भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यातील जबरदस्त टक्कर या सीजनमध्ये दाखण्यात आली आहे. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आलं आहे. मात्र, आता ही सीरिज अडचणीत सापडली आहे.