संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

वाचा : शाहरुख-अनुष्कालाही ‘ल्युडो’चे वेड

‘पद्मावती’ची घोषणा केल्यापासूनच या चित्रपटाला विरोध होण्यास सुरुवात झाली होती. करणी सेना, जयराजपूताना संघ या संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. दरम्यान, सिद्धराज सिंह चूडास्मा यांनी न्यायालयात चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. चित्रपटात पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांचे चरित्र ज्याप्रकारे दाखवले आहे, त्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मात्र यावर ‘सेन्सॉर बोर्डाने अद्याप या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही थेट या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नाही,’ असे आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

वाचा : अखेर एकमेकांसमोर येणार सलमान – ऐश्वर्या

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भन्साळी यांनी व्हिडिओद्वारे त्यांची बाजू मांडली. ‘राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग किंवा असे दृश्य चित्रीत करण्यात आले नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसतील.