सलमान खान निर्मित ‘लवयात्री’ या चित्रपटाविरोधातील एफआयआरवर सुप्रीम कोर्टाकडून गुरुवारी स्थगिती देण्यात आली आहे. सलमान खानसोबतच या चित्रपटाशी निगडीत इतर व्यक्तींविरोधात आठवड्यापूर्वी बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. १२ सप्टेंबर रोजी उप विभागीय न्यायिक दंडाधिकारी (पूर्वी) शैलेंद्र राय यांनी दिलेल्या आदेशानुसार मिथानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात सलमान खानने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

अॅड. सुधीर कुमार ओझा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. चित्रपटाच्या शीर्षकातून नवरात्री या उत्सवाची खिल्ली उडवण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याचप्रमाणे ‘लवयात्री’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अश्लीलता असून लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असाही तक्रारीत उल्लेख आहे. याआधी विश्व हिंदू परिषदेनंही चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘लवरात्री’ चित्रपटाचं नाव बदलून ‘लवयात्री’ असं ठेवण्यात आलं.

अभिराज मिनावला दिग्दर्शित या चित्रपटातून सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबतच आयुष शर्मा, वरिना हुसैन, दिग्दर्शक अभिराम मिनावाला आणि इतर कलाकार राम कपूर, रोनित रॉय यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता.