छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘खिचडी’ पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाली. २००४ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या मालिकेने पुनरागमन करत आपल्या कौटुंबिक जीवनातील कडू-गोड किस्से प्रेक्षकांसमोर दाखवत त्यांना खळखळून हसण्याची पुन्हा संधी दिली आहे. या मालिकेच्या संदर्भात ‘हंसा’ने म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
खिचडीमधील ‘हंसा’ हे पात्र विशेष गाजले. प्रेक्षकांच्या मनामध्ये हंसाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्याचप्रमाणे ‘प्रफुल्ल’, ‘बापूजी’, ‘जयश्री’ यांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘खिचडी’ मालिकेच्या नव्या सिझनच्या निमित्ताने सुप्रिया पाठक यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या यांची एक आठवण सगळ्यांबरोबर शेअर केली.

‘तीन वर्षापूर्वी एका विमान प्रवासादरम्यान माझी श्रीदेवी यांच्याशी भेट झाली होती. या भेटीदरम्यान चक्क श्रीदेवी यांनी मला हंसाप्रमाणेच संवाद साधण्यास सांगितले. तो क्षण काहीसा खजिल करणारा होता. पण, मी साकारणाऱ्या पात्रावर श्रीदेवी यांचे किती प्रेम होते, त्यांना ते पात्रं किती भावले होते, याची प्रचिती मला तेव्हा आली’, असं त्या म्हणाल्या. ‘खिचडी’च्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील या चिरतरुण अभिनेत्रीला यांनी श्रद्धांजली अर्पित करण्यात आल्याचे मालिकेचे लेखक आशिष कपाडिया यांनी सांगितले.

वाचा : #HappyBirthdaySachin : सबकुछ सचिन

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबई येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. श्रीदेवी यांनी हिंदी, तेलगू, मलल्याळम, कन्नडा या भाषांमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्या उत्तम कलाकार तर होत्याच परंतु त्यांच्यातील माणुसकीचे दर्शनही अनेकांना झाले आहे.