सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी रिया चक्रवर्तीची लायकी काढली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी बोलण्याची रियाची लायकी नसल्याचं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका झाली होती. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर रिया चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रियाने गुप्तेश्वर पांडे यांचं नाव न घेता उत्तर दिलं आहे.

“….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

रियाने सुशांतसोबत असणाऱ्या संबंधांमुळे आपण बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारु शकतो असं म्हटलं आहे. “कोणीतरी मला माझी लायकी सांगितली आहे. सुशांतवर प्रेम करते हीच माझी लायकी आहे”. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, “कोणी मला विषकन्या म्हणत आहे, कोणी म्हणत मी काळी जादू करते, असं का ? फक्त मी एका अशा व्यक्तीवर प्रेम केलं ज्याला मानसिक आजार होता आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली म्हणून”.

बिहारच्या डीजीपींचं स्पष्टीकरण
लायकी काढल्यामुळे टीका होऊ लागल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. सुशांत सिंह प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सुशांत सिंह प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा हक्क नाही असं मला म्हणायचं होतं असं सांगितलं होतं.

“लायकीचा अर्थ इंग्लिशमध्ये नैतिक पातळी नाही असा होतो. नितीश कुमार यांच्यासंबंधी वक्तव्य करण्याची रिया चक्रवर्तीची पातळी नाही. सुशांत सिंह प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आपलं नाव आहे हे रियाने विसरु नये,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं.

“जर एखाद्या राजकीय नेत्याने बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण जर आरोपी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसंबंधी निराधार वक्तव्य करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. तिने कायदेशीर लढाई लढावी,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं होतं.