अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर तिच्या वडिलांची आणि भावाची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. तसंच रियावर मनी लॉड्रिंग म्हणजे आर्थिक अनियमितता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तिचेदेखील दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, असं ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

ईडीने सोमवारी रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, मोबाइल आणि इंद्रजीत यांचा लॅपटॉप जप्त केला आहे.

दरम्यान,ईडी कार्यालयात जवळपास ९ तास इंद्रजीत आणि शोविकची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये या दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. तसंच रियाचं वार्षिक उत्पन्न आणि खर्च यांच्यात मोठा फरक असल्याचं इन्कम टॅक्स रिटर्नमधून स्पष्ट झालं आहे. रिया आणि कुटुंबीयांसोबतच एक्स मॅनेजर श्रुती मोदी, सुशांतचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.