बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खान आणि करण जौहर यांना जबाबदार ठरवले जात आहे. दरम्यान या दोघांविरोधात एक ऑनलाईन पिटिशन देखील सुरु करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सलमान खान आणि करण जौहरला धडा शिकवण्यासाठी लाखो लोकांनी त्यावर नोंदणी केली आहे.
जयश्री शर्मा श्रीकांत नावाच्या एका फेसबुक युझरने ही पिटिशन सुरु केली आहे. सुशांत सिंह राजपुतला न्याय मिळावा. सलमान आणि करण विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी. व त्यांच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा यासाठी ही ऑनलाईन पिटिशन सुरु करण्यात आली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे १६ जूनला ही पिटिशन सुरु झाली आणि २४ तासांमध्ये १६ लाख ८५ हजार लोकांनी यावर नोंदणी केली. आतापर्यंत २९ लाख ८३ हजार पेक्षा अधिक लोकांनी या पिटिशनवर सही केली करुन करण-सलमान विरोधात संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियाद्वारे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली जात आहे. करण जौहरचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स देखील कमी झाले आहेत.
सुशांतचा थक्क करणारा प्रवास
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.