अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. सुशांतची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

श्वेताने इन्स्टाग्रामवर सुशांतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘जर सत्याची किंमत नसेल तर या जगात आणखी कशालाच किंमत राहत नाही.’ सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या बहिणीने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनीही न्यायाची मागणी केली आहे.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.