अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी सध्या चौकशी सुरु असून यात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. यातच तिने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच तिने सुशांत आणि तिची लव्हस्टोरीदेखील सांगितल्याचं पाहायला मिळालं.
“मी आणि सुशांत… आमची खूप वर्षांची मैत्री होती. २०१३ मध्ये सुशांत आणि माझी पहिली भेट झाली. त्यावेळी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि सुशांतचा ‘काई पो चे’ प्रदर्शित होणार होता किंवा कदाचित झाला होता. तेव्हा तो यशराज फिल्म्समध्ये येत होता. त्यावेळी तो न्यू टॅलेंट म्हणून ओळखला जात होता. आमच्या दोघांचा मॅनेजर एकच होता. यशराज फिल्म्सच्या जीममध्ये आमची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर मग बरेचदा अवॉर्ड फंक्शन किंवा अन्य कार्यक्रमात आमच्या भेटी होत गेल्या. आमची त्यावेळी फार चांगली मैत्री झाली होती. वर्षांतून जरी एकदा भेटलो तरी आम्ही खूप गप्पा मारायचो”, असं रिया म्हणाली.
आणखी वाचा- आदित्य ठाकरेंसोबत भेट झाली होती का?, रिया चक्रवर्ती म्हणते….
पुढे ती म्हणते, “त्यावेळी मला सगळं छान वाटतं होतं. कायम वाटायचं हा मुलगा थोडा वेगळा आहे, याच्यासोबत बसून बऱ्याच गप्पा माराव्यात. त्यानंतर १३ एप्रिल २०१९ मध्ये रोहिणी अय्यर यांच्या पार्टीत आमची परत भेट झाली आणि तेथूनच आमचं अफेअर सुरु झालं. त्याने मला प्रपोज केलं होतं. पण मी मुद्दाम दोन-तीन महिन्यात सांगते असं म्हणाले”.
आणखी वाचा- सुशांतची आईही नैराश्यग्रस्त होती, रिया चक्रवर्तीचा दावा
दरम्यान, रियाने तिची आणि सुशांतची लव्हस्टोरी सांगितल्यानंतर प्रेमाची अशी शिक्षा मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं असंही म्हटलं. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी रियावर निशाणा साधला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनीदेखील तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. मात्र या सगळ्यावर रियाने या मुलाखतीत मौन सोडल्याचं पाहायला मिळालं.