बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. आता सुशांतच्या घरातल्यांनी तो नोव्हेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे.
‘इंडिया टीव्ही’ने पटणामध्ये राहत असलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार होता असे म्हटले आहे. पण सुशांत कोणाशी लग्न करणार होता हे अद्याप समोर आलेले नाही.
‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जाते. त्याची हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून सुशांतला बरे नसल्याचे त्याच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. सुशांतने आजवर हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.