बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आता इतर बॉलिवूड कलाकारांसारखीच सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या दोन्ही मुलींसोबत डान्स करताना दिसते. एका मोठ्या हॉलमध्ये ती मुलींसोबत नाचण्याचा आनंद लुटताना दिसते. सुश्मिता डान्स करताना तिच्या मुली तिला पाहून थिरकताना दिसतात. सुश्मिता मध्यभागी तर रिनी आणि अलिशा तिच्या मागे आईच्या तालावर नाचताना दिसतात.
आपल्या चाहत्यांसोबत सुष्मिताने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाइक्स आणि कमेंट आल्या आहेत. आपल्या आईसोबत ठेका धरताना मुलीही सर्व काही विसरून नाचताना दिसत आहेत. तर मध्येच व्हिडिओमध्ये सुश्मिताची छोटी मुलगी आपल्या मस्तीमध्ये दंग होऊन गायब होताना दिसते आणि परत आपल्या मोठ्या बहिणीला आणि आईला नाचात साथ देते.
सुश्मिताला आपल्या मुलींसोबत योगा करणं फार आवडतं. ती स्वतः अनेक वर्षांपासून उत्तम डाएट फॉलो करते तसेच मेडिटेशनही करते. शरीर आणि मन स्वस्थ राहिल्यामुळेच चेहऱ्यावर सतत हसू असतं असं तिचं ठाम मत आहे. सुश्मिताने ‘दस्तक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमाशिवाय तिने ‘मैं हूं ना’, ‘मैंने प्यार क्यों किया’ आणि ‘सिर्फ तुम’ या सिनेमांमध्ये काम केले. सुश्मिताने २०१० मध्ये शेवटचा सिनेमा केला. त्यानंतर ती सिनेमांमध्ये दिसलीच नाही. त्यामुळेच ती सिनेमांमध्ये पुनरागमन कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काही दिवसांपूर्वी तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले होते. त्या जाहिरातीत ती शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगताना दिसली. या जाहिरातीचा व्हिडिओ सुश्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. २१ मे १९९४ मध्ये सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. ती पहिली भारतीय महिला आहे जिने हा किताब पकावला.