पावसाळ्यातल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणाविषयी प्रत्येकालाच विशेष प्रेम असतं. कलाकारांच्याही मनात त्यांचं आवडतं पावसाळी ठिकाण असतं. तिथली एखादी आठवण, किस्सा, पदार्थ याविषयी ते त्यांच्याच शब्दांत सांगताहेत.
पाऊस आणि मुंबई-नाशिक प्रवास – अनिता दाते
पावसाचा विषय निघाला की मला आठवतं ते इगतपुरी. त्यामागे कारणंही तसंच आहे. मी मुळची नाशिकची. मालिका, सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईला सतत येणं असायचं. मुंबई-नाशिक-मुंबई हा माझा नेहमीचा प्रवास ठरलेला होता. या प्रवासात इगतपुरी हे ठिकाण यायचं. त्या परिसरात भातशेती केली जायची. ट्रेनमधून ती बघायला मला प्रचंड आवडायचं. हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा त्या वेळी दिसायच्या की मन प्रसन्न व्हायचं. सगळीकडे मस्त हिरवंगार वातावरण असायचं. मी ट्रेनच्या दरवाजात येऊन उभी राहायचे आणि त्या हिरव्यागार वातावरणाचा मनमुराद आनंद घ्यायचे. त्या भातशेतीत मध्यभागी एक फूल यायचं. ते साधारण गणेशोत्सवात यायचं. ते फूल येईस्तोवर ही शेती केली जायची. ते फूल खूप सुंदर असल्यामुळे ते तिथलं आकर्षण बनलं आहे. इगतपुरीसारखाच मला नाशिकचा पाऊसही आनंद देतो. तिथे आषाढ, श्रावण, भाद्रपद या प्रत्येक महिन्यातला पाऊस वेगळा असतो. या पावसाची मजा घेत चहा पीत निवांतपणे त्याचा आनंद घ्यायला मला नेहमीच आवडतं. पाऊस आणि चहा-कांदाभजी ही जोडी तर आवडतेच. पण त्र्यंबकेश्वरच्या परिसरात शिंगोळे हा पदार्थ मिळतो. कुळथाच्या पिठापासून तयार केला जाणारा हा पदार्थ मला प्रचंड आवडतो.
चहा आणि मॅगी! – सुव्रत जोशी
पावसाळ्यात सह्य़ाद्रीत फिरायला जी मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. पावसाळ्यातलं धुकं, सर्वत्र दिसणारी हिरवळ मन मोहून टाकतं. ते दृश्य पाहून त्यापेक्षा सुंदर काहीच नाही असं वाटू लागतं. राजमाचीला जायला मला खूप आवडतं. कॉलेजला असताना तिथे नेहमी ट्रेकला जायचो. इथे वेगवेगळ्या ठिकाणांहून झरे फुटतात. त्यात जवळजवळ ४०-५० धबधबे तयार होतात. धो-धो पावसात राजमाचीला जाणं म्हणजे भन्नाट अनुभव आहे. आम्ही मित्र एकदा प्रचंड पावसात तिथे गेलो होतो. त्या वेळी इतक्या पावसात नको वगैरे असा विचार केला नव्हता. पाऊस इतका पडत होता की कमरेच्या वर पाणी आलं होतं. तिथून बाहेर पडेस्तोवर अंधार पडला होता. चिखलातून एकमेकांचे हात धरत, काठय़ांची मदत घेत कसेबसे तिथून बाहेर पडलो. तोवर राजमाची परिसरातील गावकरी झोपले होते. त्यामुळे त्या जवळपासच्याच एका मंदिरात राहिलो. तेव्हा आमच्याकडे खायलाही फारसं काही नव्हतं. ग्लुकोजची बिस्किटं खाऊन झोपलो आणि सकाळी निघालो. ही आठवण आजही ठळकपणे आठवते. आजही आम्ही मित्र भेटलो की या आठवणीचा उल्लेख नेहमी होतो. मुंबईत आलेला पूरही मी अनुभवला आहे. निसर्गातलं सौंदर्यच जेव्हा रौद्र होतं तेव्हा आपण सगळेच त्यापुढे नमतोच. त्याचा रौद्रपणा आपल्याला विनम्र करून टाकतो. पण या रौद्रपणातही मला सौंदर्य दिसतं. प्रचंड कोसळणाऱ्या पावसात ट्रेकिंगला जाणं, चहा आणि रात्रीची मॅगी हे सगळं जुळून आलं तर भारीच मजा!
सलग आठ दिवस ताम्हिणी घाट – हेमंत ढोमे
गोवा हे अनेकांचं आवडतं ठिकाण असेल. अर्थात माझंही आहेच. पण मला ते पावसाळ्यात जास्त आवडतं. गोव्याचं खरं सौंदर्य पावसाळ्यातच दिसतं. सहसा पावसाळ्यात गोव्यामध्ये जाणं बहुतांशी लोक टाळतात. त्यामुळे त्या दिवसांत तिथे गर्दी कमी असते. समुद्रकिनारे स्वच्छ, शांत, निर्जन असतात. त्यामुळे शांतपणे निवांत गोव्याचा आनंद घेता येतो. माझं किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे गोव्यात असलो की तिथल्या समुद्रकिनाऱ्यांसह मी काही किल्ल्यांनाही भेट देतो. मला महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरही पावसात जायला प्रचंड आवडतं. पावसाळ्यात किल्ले जास्त सुंदर दिसतात. पाऊस कोसळत असेल आणि गरमागरम कांदाभजी आणि कॉफी दिली तर आनंदच! पण जर मी पावसाळ्यात गोव्यात असेन तर प्रॉन्सला पर्याय नाहीच. मागच्या वर्षी पावसाळ्यात मी लंडनला होतो. त्या वेळी मी तिकडच्या समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव घेतला. पावसातली एक जबरदस्त आठवण सांगावीशी वाटते. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सिनेमातल्या एका गाण्याचं शूट आम्ही ताम्हिणी घाटात करत होतो. सलग आठ दिवस पाऊस अक्षरश: कोसळत होता. आम्ही रोज तिथे पोहोचायचो, तयार व्हायचो आणि पाऊस न थांबल्यामुळे शूटिंग न करताच तिथून निघायचो. असं सलग आठ दिवस झालं. नवव्या दिवशी पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे आम्ही शूटिंग करू शकलो. पण त्यानिमित्ताने भर पावसात सलग आठ दिवस ताम्हिणी घाटात जाता आलं, ही मजा काही औरच आहे!
पावसातलं अलिबागचं घर – तेजश्री प्रधान
माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीचं अलिबागला घर आहे. आम्ही तिथे नेहमी जायचो. त्या घराला लागूनच एक विहीर आहे. मस्त पाणी असतं त्यात. घराच्या सभोवताल्या परिसरात खूप झाडं आहेत. जवळ समुद्र आहे. या सगळ्या वातावरणात कोणाला मजा येणार नाही? या वातावरणामुळे गावात राहिल्यासारखं वाटतं. मला मुळातच निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी मी रमले नाही तरच नवल. अलिबागच्या त्या घरी गेलो की आम्ही धम्माल करतो. तिथलं पावसाळी वातावरण तर मन प्रसन्न करून टाकणारं असतं. तिथे प्रचंड झाडं असल्यामुळे सर्वत्र हिरवंगार असतं. थंडगार वातावरणात मन रमून जातं. अगदी हिल स्टेशनला गेल्यासारखंच वाटतं. मी आणि माझे शाळेचे मित्र-मैत्रिणी ठरवून, आपापल्या कामातून सुट्टी घेऊन तिथे जायचो. आता सगळे जण आपापल्या कामात व्यग्र असतात. प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. पण त्यातूनही वेळ काढून सगळ्यांनी एकत्र जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्या जवळच्या, आवडत्या माणसांसोबत आवडत्या ठिकाणी, आवडत्या ऋतूत फिरणं म्हणजे सुख आहे. या सुखात भर पडते ती माशांची! पावसात मला काय खायला आवडेल असं कोणी मला विचारलं तर माझं उत्तर तयार असतं; मासे. धो धो पडणाऱ्या पावसात मला जर तुकडी (माशाचा प्रकार) मिळाला तर माझ्यासारखी सुखी मीच!
शब्दांकन – चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com@chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा