सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी सिनेमा टायगर जिंदा हैचे पहिले गाणे स्वॅग से सबका स्वागत प्रदर्शित करण्यात आले आहे. सलमानचे चाहते या गाण्याची केव्हापासून वाट पाहात होते. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच लाखो लोकांनी हे पाहिले आणि शेअरही केले. या गाण्याच्या सुरूवातीलाच ‘हुडी’ घातलेला सलमान नजरेस पडतो. या संपूर्ण गाण्यात तो स्वॅग मूडमध्येच दिसतो. सलमानच्या स्वॅग मूडला कतरिनाही त्याच तोडीने उभी राहिलेली दिसते. प्रेक्षकांना या दोघांची जोडी नेहमीच आवडते. या गाण्याने त्यांच्या चाहत्यात अजून भर पडेल हे मात्र नक्की.

या सिनेमाची आतापर्यंत जेवढी चर्चा झालेय त्याचे मुख्य कारण कतरिनाच राहिली आहे. तिचा या सिनेमातील लूक पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. तिने प्रेक्षकांच्या अपेक्षा फोल ठरवल्या नाहीत असेच म्हणावे लागेल. कारण या गाण्यातील कतरिनाच्या मादक अदांवर लाखो चाहते फिदा होतील यात काही शंका नाही. खूप वर्षांनी सलमानला अशा धाटणीच्या गाण्यावर नाचताना पाहून तुमचेही पाय थिरकायला लागतील यात काही शंका नाही. विशाल ददलानी आणि नेहा भसीन यांनी हे गाणे गायले असून विशाल-शेखरने या गाण्याला संगीत दिले आहे. इरशाद कामिलने गाण्याचे बोल लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. या सिनेमात सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीसोबतच अफलातून स्टंटबाजीसुद्धा पाहता येणार आहे, असंच म्हणावं लागेल. या सिनेमातील साहसदृश्यं अधिक प्रभावी करण्यासाठी अॅक्शन डायरेक्टर टॉम स्ट्रथर्स यांना पाचारण करण्यात आलं आहे. या सिनेमासाठी सलमानने घोडेस्वारीचं प्रशिक्षणही घेतले.

सलमानसोबतच कतरिनानेही या सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली आहे. तिने सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी मशीनगन चालवण्यापासून ते तलवारबाजीपर्यंतचे प्रशिक्षण घेतले. ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण ऑस्ट्रिया आणि अबूधाबी या देशांत झाले आहे.