सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील दयाबेन अर्थान दिशा वकानीने तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गुरूवारी सकाळी तिने मुंबईतील पवई येथे एका मुलीला जन्म दिला.

स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी दिशाला २० डिसेंबर तारीख दिली होती. पण त्याआधीच दिशाच्या घरी गोडपरीचे आगमन झाले आहे. दिशा वकानीने २४ नोव्हेंबर २०१५ ला मुंबईस्थित मयूर पांडा याच्याशी लग्न केले होते. मयूर आणि दिशासोबतच त्यांच्या घरातल्यांसाठीही सध्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दिशाने गरोदरपणात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या चित्रीकरणामध्ये ब्रेक घेतला होता. तेव्हा असे म्हटले जात होते की, मालिकेचे निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. पण नंतर निर्माते असित मोदीने दिशाच या मालिकेचा हिस्सा असेल असे स्पष्ट केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरोदरपणात दिशाच्या सासूने तिची फार काळजी घेतली होती. दिशाला सेटवर सोडायला त्या स्वत: यायच्या. तसेच दिवसभरात तिला काही त्रास तर होत नाही ना, याचीही त्या योग्य काळजी घ्यायच्या. निर्मात्यांनी तिच्यासाठी चित्रीकरणाचे तासही कमी केले होते.

सब टीव्हीची ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका प्रेक्षकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सारेच आवडीने पाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने टॉप- १० मधील आपले स्थान कधीही हलू दिलेले नाही.