करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतं आहे. या सगळ्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर होतं आहे. काही कलाकारांनी फळे आणि भाज्या विकून दिवस काढले. तर, आता देखील अशी परिस्थिती अनेकांसमोर आली आहे. दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील अभिनेते अतुल वीरकर यांना अगरबत्ती आणि पेपर विकावे लागतं आहे.
एकीकडे अतुल यांना काम मिळत नाहीये तर दुसरीकडे त्यांच्या मुलाला ‘एलन हर्डेन डेडली सिंड्रोम’ या आजाराने ग्रासलेला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुल यांनी त्यांच्या परिस्थिती बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. “लॉकडाउनमुळे फक्त माझं नाही तर सगळ्यांचं नुकसान झालंय. पण माझी अडचण थोडी वेगळी आहे. माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी आहे जो अत्यंत गंभीर आजाराने गासलेला आहे. माझा मुलगा बाकी मुलांसारखा उभा राहू शकत नाही, कोणतंही काम करू शकत नाही. तो नेहमी बेडवर झोपलेला असतो. या आजारावर भारतात कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यासाठी मला नेदरलॅंडहून औषधं मागवावी लागतील. ‘एलन हर्डेन डेडली सिंड्रोम’ (Allan Herndon Dudley Syndrome) आजारावर औषध तयार करणाऱ्या देशांपैकी नेदरलँड एक आहे,” असे अतुल म्हणाले.
पुढे कलाकारांकडून त्यांना काही मदत मिळेल या आशेने ते म्हणाले, “मी अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्येही काम करतोय. अनेक कलाकार आहेत जे मला मदत करतायत. पण त्यांची मदत पुरेशी नाहीये. यापूर्वीही आर्थिक अडचणींमध्ये मी दारोदार जाऊन अगरबत्त्या विकल्या आहेत. वृत्तपत्र विकली आहेत. मी आताही खूप मेहनत करण्यासाठी तयार आहे. कारण त्यातुन मिळणाऱ्या पैशांतून मी माझ्या मुलाला पूर्णपणे ठीक करू शकेल. डॉक्टरांनी आम्हाला कुठेही बाहेर जाण्यापासून मनाई केली आहे. जेणेकरून माझ्या मुलाला करोनाची लागण होणार नाही.”
‘केवळ सरकारला दोष देण्याऐवजी…’, जेठालालने केले चाहत्यांना आवाहनhttps://t.co/v1FkuJdAk1 < येथे वाचा सविस्तर वृत्त #CoronaVirus #CoronavirusIndia #Mask #SocialDistancing #CoronaVaccine #DilipJoshi #Jethalal #TMKOC @dilipjoshie pic.twitter.com/y5vuiTVyvL
— LoksattaLive (@LoksattaLive) May 10, 2021
‘एलन हर्डेन डेडली सिंड्रोम’ हा आजार मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे मेंदुची आणि कवटीची वाढ पूर्णपणे होतं नाही. याचा परिणाम हा मेंदुवर होतो आणि मेंदुच्या काही नसा या आकुंचित राहतात. यामुळे बाळाच्या मेंदुची पूर्ण वाढ होतं नाही. मेंदुची वाढ न झाल्याने संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो. हाडांची वाढ होत नसल्याने शरीर अशक्त होते. काही मुलांना तर बोलता येत नाही तर काहींच्या मानेच्या स्नायूंची वाढ अरुंद होते.