दाक्षिणात्य चित्रपट आणि त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे. ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने विशेष पुरस्कार दिला गेला. ८ एप्रिल रोजी रविवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात तमन्नाला श्रीदेवी पुरस्काराने गौरविण्यात आलं.

श्रीदेवी यांच्या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तमन्नाने मुख्य भूमिका साकारली होती. ‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटासह तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘कन्ने कलई माने’, ‘ना नुव्वे’, ‘खामोशी’ आणि ‘क्वीन वन्स अगेन’ हे तमन्नाचे आगामी चित्रपट आहेत.

Video: नागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ पाहिलात का?

श्रीदेवी पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर तमन्नाने तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली की, ‘चित्रपटसृष्टीत श्रीदेवी या नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी राहिल्या आहेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी त्यांच्या चित्रपटांतूनच प्रेरणा घेतली. त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने माझा गौरव होणं, हे मी माझं भाग्य समजते. मीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच कमी वयात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी कशाप्रकारे वर्षानुवर्ष अखंड मेहनत घ्यावी लागते, हे मी योग्यप्रकारे समजते.’

श्रीदेवी यांचा फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. त्या ५४ वर्षांच्या होत्या.