अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर कलावर्तुळात सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. २००८ मध्ये ही घटना घडली होती आणि हे संपूर्ण प्रकरण काय होतं, तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने खुलासा केला आहे. पत्रकार जॅनिस सकीरा हिने ट्विटरच्या माध्यमातून ही सर्व हकीगत सांगितली आहे.

‘काही घटना दहा वर्षांपूर्वीही घडल्या असल्या तरी आयुष्यभर त्या स्मरणात राहतात. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर तनुश्रीसोबत जे काही घडलं ते अशाच घटनांपैकी एक आहे. त्यावेळी मी तिथं उपस्थित होते,’ असं ट्विट जॅनिसने केलं. वार्तांकन करण्यासाठी जॅनिस सेटवर गेली होती. पण जेव्हा ती सेटवर पोहोचली तेव्हा शूटिंग थांबल्याचं चित्र तिला पाहायला मिळालं होतं.

जॅनिसने ट्विटमध्ये काय लिहिले?

‘त्यावेळी तनुश्री सेटवर अत्यंत निराश दिसत होती. तर इतर ५० ज्युनिअर आर्टिस्ट शूटिंग पूर्ववत होण्याची वाट पाहत बसले होते. सेटवर थोडी विचारपूस केली असता हिरोईन सहकार्य करत नाही असं ऐकायला मिळालं. थोड्या वेळाने शूटिंगला सुरुवातही झाली. नाना पाटेकर यांच्यासोबत शूटिंगला सुरुवात केल्यानंतर तनुश्री तावातावाने सेट सोडून निघून गेली. त्यामुळे पुन्हा एकदा शूटिंग थांबली. तनुश्री व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसली आणि आतून तिने दार बंद केलं होतं. व्हॅनच्या बाहेर येण्यासच ती नकार देत होती. अचानक काही माणसं तिथं आली आणि ते जोरजोरात व्हॅनिटी व्हॅनचं दार वाजवू लागले. निर्मात्यांनी त्या माणसांना सेटवर बोलावलं असं मला त्यावेळी सांगण्यात आलं होतं. काही वेळाने पोलीससुद्धा आले. हे सर्व घडत असताना मी नाना पाटेकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘मेरी बेटी जैसी है’ (ती माझ्या मुलीसारखी आहे) असं ते म्हणाले. पण ते कशाबाबत बोलत होते तेच मला समजलं नाही.’

‘काही वेळानंतर तनुश्रीचे आईवडील तिला घेऊन जाण्यासाठी सेटवर पोहोचले. तिच्या गाडीवर कोणीतरी हल्ला केला होता. घडलेल्या घटनेबाबात बोलण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या दिवशी तिने मला तिच्या घरी बोलावलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.’

‘एका गाण्याच्या शूटिंगसाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी तीन दिवस तिच्याकडून सराव करून घेतला. पण जेव्हा नाना पाटेकर त्या गाण्यासाठी शूट करणार होते, तेव्हा ऐनवेळी काही स्टेप्स त्यांनी बदलले. काही डान्स स्टेप्सदरम्यान नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी शूटिंग अर्ध्यावर सोडून निघाले,’ असं मला तनुश्रीने सांगितलं.

२००८ मध्ये तनुश्रीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगतानाच ‘जर घडलेली घटना खोटी असेल, तिचे आरोप निराधार असतील तर दहा वर्षांनंतरही एखादा माणूस तेच सगळं जसंच्या तसं कसं सांगू शकणार?,’ असा सवाल जॅनिसनं ट्विटरवर केला. तनुश्रीने तेव्हाच आवाज का उठवला नाही असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की तिने तेव्हासुद्धा मुलाखती दिल्या होत्या. त्या मुलाखतींमध्ये तिने घडलेला प्रकार तेव्हाही सांगितला होता. पण तेव्हा तिच्यावर अव्यवहारिक असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनीही आता मौन सोडलं. ‘सेटवर १०० – २०० लोक उपस्थित होते मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केलं असं ती का म्हणतेय, कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार, कोणी काहीही म्हटलं तरी मला जे आयुष्यात करायचं आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे.